धम्मपद-ब्राम्हण वग्गो : 292
छिन्द सोतं परक्कम्म कामे पनुद ब्राम्हण/
सङ्खारानं खयं ञत्वा, अकतञ्ञु’ सि ब्राम्हण//३८३.
……………………..संस्कारक्षय जाणून निर्वाणाचे जाणकार व्हा
अर्थ : श्रोत छिन्न करणे म्हणजे, प्रवाह कापणे. इथे श्रोत म्हणजे आसक्ती. ज्याने हा आसक्तीचा श्रोत कापून काढला त्याला श्रोत जिंकणारा अर्थात “श्रोतापन्न” असे म्हटलेले आहे. श्रोतापन्न हा पृथकजनच (सर्वसामान्य) परंतु आर्य समजला जातो. पहिली तीन संयोजने “सक्काय दिट्ठि/सत्काय दृष्टी, विचिकिच्छा/ संशय, सीलव्रत परामंस/चुकीच्या कर्मकांडात अडकणे.” ही नष्ट करणारा श्रोतापन्न होतो.
स्पष्टीकरण: श्रावस्तीमध्ये एक ब्राम्हण भगवंतांच्या उपदेश ऐकून अत्यंत श्रध्दाळू झाला आणि तो दररोज १६ भिक्षूंना नित्य दान देऊ लागला. भिक्षूं घरी आले की तो त्यांना श्रध्देने “या अर्हत, बसा अर्हत, भोजन करा अर्हत,” असे म्हणत असे. त्याच्याकडून अर्हत असे संबोधतांना अर्हत भिक्षुच्या मनात विचार येत असे की, “आपल्या अर्हत होण्याला हा जाणतो तर!” मात्र साधारण भिक्षुला वाटे की, आम्ही अर्हत नसतांनाही तो आम्हाला अर्हत म्हणून संबोधतो तर त्याचे बोलणे उपरोधिक तर नाही ना? अशा संकोचाने एकेदिवशी एकही भिक्षु त्याच्या घरी भोजन करण्यास गेला नाही.
जेव्हा त्या ब्राम्हणाने पाहिले की, कोणीही भिक्षु भोजनास आला नाही, तेव्हा तो अत्यंत दुःखी झाला आणि जेतवनात भगवंतांकडे गेला आणि म्हणाला,
भगवान! आज एकही आर्य माझ्याकडे भोजनासाठी येत नाही. तेव्हा भगवंतांनी त्या सर्व भिक्षूंना बोलावून विचारले की,
भिक्षूंनो! आपण या ब्राम्हणाकडे न जाण्याचे कारण काय?
भिक्षूंनी सांगितले, ब्राम्हणाद्वारे त्यांना अर्हत म्हणून संबोधल्यामुळे असे घडले.
भगवंतांनी तेव्हा त्या भिक्षूंना विचारले,
काय तुम्ही अर्हत्वाला स्विकारले नाही? भिक्षूंनो! तो ब्राम्हण तुम्हाला श्रद्धेने अर्हत म्हणतो. श्रद्धेने असे संबोधण्यात काहीही दोष नाही. या ब्राम्हणाचे अर्हतांवर खूप प्रेम आहे. म्हणून तुम्हालाही तृष्णेच्या प्रवाहास नष्ट करून अर्हत्व मिळवणेच योग्य आहे. भगवान पुढे म्हणाले,
भिक्षूंनो! पराक्रमाने तृष्णेच्या श्रोतालाच छिन्न करून टाका आणि कामवासनांना दूर करा. संस्कार क्षय जाणून तुम्ही अकृत निर्वाणाचा साक्षात्कार कराल. निर्वाण अकृत आहे. हे करण्याने होत नाही तर सर्वकाही सोडण्याने प्राप्त होते. असा उपदेश करून भगवंतांनी वरील गाथा म्हटली.
प्रा. बी. आर . शिंदे ( विशेष कर्णबाधिरांचे शिक्षण – [Children with Hearing Impairment]
नेरूळ ,नवी मुंबई 706
Author.
Buddhist philosopher; Follower of Dr B R Ambedkar.
#brshinde_CWHI
Email: balajiayjnihh@gmail.com
Mobile 9702158564