तुझ्या हाती तूप आलं तुझ्या हाती साय
समाजाचं काय रं गड्या समाजाचं काय
तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी
राहायला माडी तुला बसायला गाडी
सांग तुझा धंदा असा आहे तरी काय
समाजाचं काय रं गड्या समाजाचं काय
काम नाही धाम नाही सकाळी उठुनी
सुख तुला सारं गड्या येतंय रं कुठुनी
सांग तुझा छंद असा आहे तरी काय
समाजाचं काय रं गड्या समाजाचं काय
तुझ्यासाठी तुझ्याकडं सारं काही हाय रं
माझ्यासाठी तुझ्याकडं आहे तरी काय रं
पुसते रोज वामनला वामनची माय
समाजाचं काय रं गड्या समाजाचं काय
—लोकशाहीर वामनदादा कर्डक