शिक्षिका, लेखिका, कवयत्री, माता, समाजसेविका अशा विविध भूमिकेतून सावित्रीआईने समाजातील गोरगरीब, दुर्बल घटकांची सेवा करण्यात आपले सारं आयुष्य पणाला लावलं. समाजातलं स्त्रीदास्यत्व मिटविण्यासाठी स्त्रियांनी शिकून सवरुन स्वावलंबी बनावं, म्हणजे त्यांना आपल्या खर्या शक्तीची ओळख होऊन पुरुषप्रधान समाजाची गुलामगिरी पत्करण्याची वेळ येणार नाही असं ठाम मत त्यांनी स्त्रियांपुढे मांडलं….
सावित्रीच्या लेकी: आजची स्त्री हि शिक्षणाच्या प्रभावाने धीट झाली , चार भिंती ओलांडून घराबाहेर पडली. विकासाची नवनवी स्त्री मिळवती झाली, अधिक स्वतंत्र झाली , आर्थिक बाबतीत अधिक स्वावलंबी झाली .’स्त्री’ या शब्दांत असणारी शक्ती, निर्भिडता, आत्मविश्वास तिच्यांत आला, स्त्री शिक्षीत झाली तरच ती अन्यायाविरूध्द लढू शकते. शिक्षणामुळे आचार-विचारात प्रचंड परिवर्तन घडून येते विचारांमध्ये क्राती येते अस म्हंटल जात पण,जर आजची शिकलेली , सुदृढ, सक्षम आईच आपल्या मुलींना अंतरिक्षामध्ये कल्पना चावलासारखी झेप घ्यायला शिकविण्याऐवजी वडाला फेरा माराचला शिकवत असेल तर काय म्हणावे ?…..
स्त्री म्हणजे प्रजोत्पादनाचे मानवी साधन, स्त्री ही पायाची दासी असून तिने पुरुषाच्या सुखासाठी उभे आयुष्य खर्च करावे, स्त्रीने शिक्षण घेणे म्हणजे धर्म बुडविणे, स्त्री शिकायला लागली की विधवा होते अशा खुळचट समजुती ज्या समाजात रूढ होत्या त्या समाजात स्त्रियांच्या शिक्षणासाठी झटणारी देशातील पहिली महिला शिक्षिका, सनातन्यांकडून होणाऱ्या हल्यांना न घाबरता शिक्षणातून प्रतिगामी समाजात क्रांतीची बीजे रोवणारी धाडसी महिला समाजसुधारक म्हणजे सावित्रीबाई फुले होय……
त्यांनी केलेल्या संघर्षामुळे आजची स्त्री विविध क्षेत्रात भरारी घेत आहे, परंतू अतिशय वेगवान झालेल्या या आपल्या जीवनात आपण सावित्रीआईंनी केलेलं महान कार्य विसरत चाललोय हे अतिशय खेदाने नमूद करावं लागतंय. केशवपन, बालविवाह इत्यादी धर्माच्या नावावर महिलांवर अन्याय करणाऱ्या प्रथांविरुद्ध टोकाची प्रतिकूल परिस्थिती असताना सावित्रीबाई लढल्या. आजच्या मुली स्वतःला सावित्रीच्या लेकी म्हणवून घेतात पण हुंड्यासारख्या अन्यायकारी प्रथेला साधा विरोध सुद्धा करत नाहीत, हे दुर्देव आहे. आजही या पुरुषप्रधान समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते. लग्न झाल्यावर मुलीनेच मुलाच्या घरी का जायचं? मुलीनेच मंगळसूत्र का घालायचे? मुलीनेच स्वयंपाक, घरकाम का करायचे? हे प्रश्न आतापर्यंत किती मुलींनी या पुरुषप्रधान समाजाला विचारले? धर्म आणि परंपरेच कारण पुढे करून हा पुरुषप्रधान समाज आजही स्त्रियांना दुय्यमच लेखतोय. मासिक पाळीच कारण पुढे करून महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. सावित्रीच्या लेकींनी अशा प्रथेविरुद्ध आवाज उठविणे अपेक्षित आहे. विविध क्षेत्रात महिला प्रगती करीत असल्या तरी आजही महिलांचा सामाजिक,राजकीय सहभाग कमी आहे. चूल आणि मुल एवढ्यापुरतच जीवन असणारी एकेकाळची स्त्री आता विविध क्षेत्रात भरारी घेऊन स्वतःच कर्तृत्व सिद्ध करत असलं तरी सावित्रीच्या लेकींचा संघर्ष अजून संपलेला नाही. कारण आजही बराचसा समाज स्त्रीकडे वस्तू म्हणूनच बघतोय या मानसिकतेविरुद्ध सावित्रीबाईंची लेकींना लढावे लागेल……
Inframe: वनश्री वनकर 📸 (Ambedkarite, Speaker, Writer, Poet, Artist, Socialist)
Instagram handle: www.instagram.com/vanee_ness