एक किस्सा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अभिनेता दिलीप कुमार” यांचा..

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे आज सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन झाले असून ते 98 वर्षांचे होते.

दिलीप कुमार :-दिलीप कुमार यांचे पूर्ण नाव ‘मोहम्मद युसूफ खान’ असे होते. हिंदी चित्रपटसृष्टीत दिलीप कुमार यांना The First Khan म्हणून ओळखले जात होते. आपल्या कारकिर्दीत दिलीप कुमार यांनी अनेक सिनेमे केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत दिलीप कुमार यांची पहिलीच भेट आणि त्याच क्षणी दोघांमध्ये निर्माण झालेली कटुता

माईसाहेब आंबेडकर लिखित ‘बाबासाहेबांच्या सहवासात’ या पुस्तकामध्ये हा किस्सा माईसाहेबांनी अधोरेखित केला आहे.

मिलिंद कॉलेजच्या पायाभरणीपासून ते उभारणीपर्यंत माईसाहेब ह्या बाबासाहेबांसोबत सावलीसारख्या उभ्या होत्या. यावेळी त्यांचे धाकटे भाऊ बाळू कबीर हे देखील अधून मधून सोबत असायचे.

झाले असे की औरंगाबाद मध्ये मिलिंद कॉलेज चे काम सुरू होते. बाबासाहेब जेव्हा औरंगाबादला जात तेव्हा ते रेल्वे हॉटेल म्हणजेच आताचे हॉटेल अशोका याठिकाणी ते थांबत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देशभरात झाले होते. तसेच या काळात दिलीप कुमार हे देखील लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले होते. एकामागोमाग एक त्यांचे अनेक सिनेमे हिट झाले होते. यापूर्वी या दोघांची भेट झाली नसली तरी एकमेकांचे नाव ऐकले नसेल तर नवलच.

एकदा बाबासाहेब याच हॉटेलमध्ये थांबले असता नट दिलीप कुमारही रेल्वे हॉटेल मध्ये थांबला. हि गोष्ट बाबासाहेबांचे मेव्हणे बाळू कबीर यांना समजली.

दोघेही एकाच हॉटेल मध्ये असताना बाबासाहेबांचे मेव्हणे बाळू कबीर यांनी दिलीप कुमार यांची भेट घेऊन सांगितले की बाबासाहेबही याच हॉटेल मध्ये थांबले आहेत.

यावर दिलीप कुमार म्हणाले की “ओह बहुत अच्छी बात है! यह तो मै अपना सौभाग्य समझुगा!” कबीरांनी दिलीप कुमारची बाबासाहेबांना ओळख करून दिली.

बाबासाहेबांनीही आपुलकी दाखवत दिलीप कुमार यांचे स्वागत केले. बाबासाहेब जरासे हसून एका रिकाम्या खुर्चीकडे हात करून म्हणाले “बैठीये”.

त्यांच्या अनेक विषयांवर गप्पा झाल्या. राजकारण ते सिनेमा असे बरेच काही मुद्दे दोघांनी रंगवले. नंतर विषय आला तो मिलिंद कॉलेजचा.

दिलीप कुमार यांनी मिलिंद कॉलेजसाठी भरभक्कम देणगी देण्याचा प्रस्ताव बाबासाहेबांपुढे ठेवला. बाबासाहेब शांतपणे ऐकत होते. आणि त्यांच्या प्रस्तावावर छोटंसे स्मित करून पुन्हा शांत झाले.

दिलीप कुमार यांनी पुन्हा देणगीचा प्रस्ताव समोर ठेवला आणि मिलिंद कॉलेजच्या प्रवेशद्वाराला स्वतःचे नाव देण्याची अटही ठेवली. आता मात्र बाबासाहेब चिडले.

बाबासाहेबांनी दिलीप कुमार यांना खड्या शब्दात सुनावत म्हटले की, सिनेसृष्टीतील लोकांकडे कॅरेक्टर नामक गोष्टच नसते हे पुन्हा खात्रीशीर पटले. बराच संवाद झाला.

प्रचंड झापून दिलीप कुमार यांचा प्रस्ताव बाबासाहेबांनी धुडकवला. दिलीप कुमार तेथून निघून गेले. बाळू कबीर मात्र नाराज झाले.

झाल्या प्रकारावर बोलताना बाळू कबीर म्हणाले, “या नटाकडे लाखो रुपये आहेत. आपण ज्या शिक्षण संस्था चालवतो त्यांना सध्या आर्थिक सहाय्याची खूप गरज आहे. आपण त्याच्याशी सलगीने वागला असता आणि त्याला विनंती केली असती तर त्याने आपल्या संस्थेला लाखो रुपये दान सहज दिले असते.

मेव्हण्याच्या शब्दांनी क्रोधित झालेल्या बाबासाहेबांनी बाळू कबीरांना स्पष्ट सुनावलं की, “काय म्हणतोस? मूर्ख आहेस तू. ज्या लोकांनी आपल्या शील, चारित्र्याचे प्रदर्शन मांडून धनदौलत कमावली आहे अशा लोकांकडून मी कधीच पैशांची अपेक्षा केली नाही आणि करणारही नाही.

ज्यांनी अनीतीच्या आणि भ्रष्ट मार्गाने धनदौलत जमवली आहे, त्यांच्या मदतीच्या बळावर ज्ञान दानासारखे पवित्र कार्य मी कधीही करणार नाही. मग माझ्या संस्था मेल्या तरी बेहतर!

थोडक्यात काय तर पैशाचे दान देणाऱ्याचे इंटेशन महत्त्वाचे असते.. त्याने देऊ केलेली रक्कम ही क्षुल्लक असते. हे बाबासाहेबांच्या कृतीतून दिसून येते. शिक्षणासारखे पवित्र कार्य तितक्याच पावित्र्याने जोपासण्यासाठी जीवाची किती हि तळमळ!

📱

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *